ब्रेकिंगमहाराष्ट्र
शेतकऱ्याच्या लेकीची गगनभरारी; साक्षी देवकरचे घवघवीत यश
मुंबईहून गावाकडे परतलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनीने एसएससीत ९५ टक्के गुणांसह विज्ञानात मिळवले शंभरपैकी शंभर

0
7
6
4
9
7
शेतकऱ्याच्या लेकीची गगनभरारी; साक्षी देवकरचे घवघवीत यश
मुंबईहून गावाकडे परतलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनीने एसएससीत ९५ टक्के गुणांसह विज्ञानात मिळवले शंभरपैकी शंभर
तुळजापूर : जिद्द, चिकाटी आणि आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असेल तर कोणतीही परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही, हे तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील होतकरू विद्यार्थिनी कु. साक्षी शिवाजी देवकर हिने सिद्ध करून दाखवले आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील साक्षीने एसएससी बोर्ड परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवत विज्ञान विषयात शंभरपैकी शंभर गुणांची चमकदार कामगिरी केली आहे.
साक्षीचे आई-वडील उदरनिर्वाहासाठी मुंबईत छोटेखानी काम करत होते. मात्र कोविड-१९ महामारीच्या काळात रोजगार गमावल्याने त्यांना गावाकडे परतावे लागले. गावी आल्यानंतर शेती हा एकमेव आधार उरला असतानाही आपल्या मुलीच्या शिक्षणात कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले.साक्षीला चांगले शिक्षण मिळावे यासाठी तिच्या आई-वडिलांनी दररोज तब्बल ३० किलोमीटरचा प्रवास केला. पालकांचे हे कष्ट पाहून साक्षीनेही अभ्यासात स्वतःला झोकून दिले आणि मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले.विशेष म्हणजे, साक्षी मागील पाच वर्षांपासून तुळजापूर येथील मंगळवार पेठ, येथील नामांकित AIT क्लासेसमध्ये प्राध्यापक आतिश घाटशिळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत होती. आपल्या यशामागे पालकांसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याची भावना साक्षीने व्यक्त केली.तीर्थक्षेत्र आई तुळजाभवानीच्या नेत्रछायेखालील कार्ला गावातील या विद्यार्थिनीच्या यशामुळे संपूर्ण परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
0
7
6
4
9
7




