Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

गणेशोत्सवापूर्वी तुळजापुरात गणेशोत्सवाला गालबोट लावाल तर खैर नाही! तुळजापूर पोलिसांचा शहरातून रूट मार्च

समाजकंटकांना पोलिसांचा स्पष्ट इशारा; मुख्य मिरवणूक मार्ग, संवेदनशील ठिकाणे अन् गुन्हेगारी वस्त्यांमधून जोरदार संचलन

0 8 5 6 2 6

गणेशोत्सवापूर्वी तुळजापुरात गणेशोत्सवाला गालबोट लावाल तर खैर नाही! तुळजापूर पोलिसांचा शहरातून रूट मार्च

समाजकंटकांना पोलिसांचा स्पष्ट इशारा; मुख्य मिरवणूक मार्ग, संवेदनशील ठिकाणे अन् गुन्हेगारी वस्त्यांमधून जोरदार संचलन

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

तीर्थक्षेत्र आई तुळजाभवानीच्या पावन नगरीत आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेची चोख तयारी दाखवत शहरातून दमदार रूट मार्च काढला. गणेशोत्सवाच्या काळात शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना या संचलनातून खाकीचा स्पष्ट इशारा देण्यात आला.

गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा सण असला तरी कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कडक संदेश पोलिसांनी दिला. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, अनुचित प्रकारांना आळा घालणे आणि संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती ठळकपणे दाखवणे, या उद्देशाने हा रूट मार्च घेण्यात आला.

मुख्य मिरवणूक मार्गांवर खाकीची नजर!

तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहर परिसरातून काढण्यात आलेला रूट मार्च मुख्य गणेश मिरवणूक मार्ग, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची वस्ती, संवेदनशील ठिकाणे तसेच महत्त्वाच्या चौकांमधून मार्गस्थ झाला.

पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह झालेल्या या संचलनामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. गणेशोत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी तसेच मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

‘कायद्याशी पंगा घेतलात तर खाकी तयार!’

गणेशोत्सवाच्या नावाखाली शांतता भंग करण्याचा, दहशत निर्माण करण्याचा अथवा अनुचित प्रकार घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा थेट संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला.

गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी उत्सव आनंदात साजरा करताना नियमांचे पालन करावे, पोलिसांना सहकार्य करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले.

५ अधिकारी, ५० अंमलदार, ६० होमगार्ड अन् राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी

या रूट मार्चमध्ये ५ पोलीस अधिकारी, ५० पोलीस अंमलदार, ६० होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी सहभागी झाली होती. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र दिसून आले.

सायंकाळी ४.५० वाजता सुरू झालेला रूट मार्च ६.२० वाजता समाप्त झाला.

गणेशोत्सव शांततेतच; पोलिसांचा ‘अॅक्शन मोड’ तयार!

गणेशमूर्ती प्रतिष्ठापना, आरती, धार्मिक कार्यक्रम तसेच विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक नियोजन केले आहे. संवेदनशील ठिकाणे, गर्दीचे भाग आणि प्रमुख मिरवणूक मार्गांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

भक्तीचा उत्सव शांततेत साजरा करा; मात्र कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर कारवाई अटळ, असा कडक इशारा तुळजापूर पोलिसांनी दिला आहे.

वरिष्ठांच्या आदेशाने खाकी सज्ज

धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या आदेशाने, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील यांच्या आदेशानुसार आणि तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च पार पडला.

गणेशोत्सव काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तुळजापूर पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास या संचलनातून नागरिकांना देण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे