ब्रेकिंगमहाराष्ट्र
सोयाबीन करपले; बळीराजा हवालदिल! शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘छावा’ मैदानात; नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाराशिवमध्ये सोमवारी शेतकरी आसूड-रूमणे मोर्चा
‘बळीराजा घाबरू नकोस, छावा तुझ्या पाठीशी!’

0
8
5
6
3
0
सोयाबीन करपले; बळीराजा हवालदिल!
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘छावा’ मैदानात; नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाराशिवमध्ये सोमवारी शेतकरी आसूड-रूमणे मोर्चा
धाराशिव | ज्ञानेश्वर गवळी
पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा संकटाचे सावट गडद झाले आहे. मराठवाड्याचे प्रमुख पीक असलेले सोयाबीन पावसाअभावी शेतातच अक्षरशः करपून जाण्याची वेळ आली असून, बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पावसाचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी अखिल भारतीय छावा मराठा संघटनेने आता रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात शेतकरी प्रश्नांसाठी दौरा सुरू करण्यात येत असून, या दौऱ्याची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातून होणार आहे. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी धाराशिव शहरालगत पळसवाडी चौक, धाराशिव-तुळजापूर महामार्गावर सोमवारी दुपारी १२ वाजता भव्य शेतकरी आसूड व रूमणे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
◾‘बळीराजा घाबरू नकोस, छावा तुझ्या पाठीशी!’
पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सोयाबीनचे पीक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. उत्पादनासाठी केलेला खर्च, पावसाची प्रतीक्षा आणि आता पिके करपण्याची वेळ यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांच्या संकटाची तातडीने दखल घ्यावी, अशी भूमिका छावा संघटनेने घेतली आहे.
“बळीराजा घाबरू नकोस, छावा संघटना तुझ्या पाठीशी आहे,” असा निर्धार संघटनेने व्यक्त केला असून, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
◾धाराशिवनंतर मराठवाड्यात आंदोलनाची धग?
नानासाहेब जावळे पाटील यांच्या मराठवाडा दौऱ्याची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातून होत असल्याने या मोर्चाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आसूड आणि रूमणे घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार असल्याचे संघटनेने सांगितले आहे.
या मोर्चात धाराशिव जिल्ह्यातील तमाम शेतकरी तसेच छावा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत करपणाऱ्या सोयाबीनकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आता शेतकऱ्यांच्या हातातील आसूडाचा आवाज किती बुलंद होतो, याकडे धाराशिवसह संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.
“जय जवान, जय किसान… जय छावा!”
0
8
5
6
3
0



