Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

आकाशात अवतरली भवानी माता! ३०० ड्रोनमधून साकारला शाकंभरी नवरात्रोत्सवातील अद्भुत भक्तीसोहळा

0 7 6 5 0 5

आकाशात अवतरली भवानी माता! ३०० ड्रोनमधून साकारला शाकंभरी नवरात्रोत्सवातील अद्भुत भक्तीसोहळा

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य व अत्याधुनिक ड्रोन शोने भाविकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. धाराशिव जिल्ह्यात प्रथमच साकारलेल्या या अद्वितीय ड्रोन शोमुळे भक्ती, परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुपम संगम अनुभवता आला.या भक्तिमय सोहळ्याची सुरुवात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते श्री तुळजाभवानी देवींच्या पूजनाने झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद उर्फे पिंटू गंगणे, सौमय्या श्री पुजार, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, तेरखेडा फटाका असोसिएशनचे अध्यक्ष फरीद पठाण, अलियाज दारूवाले, तय्यब हुसेन दारूवाले यांच्यासह मंदिर संस्थानचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

▪️आकाशात साकारली देवतांची दिव्य रूपे

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर साकारलेल्या या शोमध्ये तब्बल ३०० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात विविध धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक प्रतिकृती उभ्या करण्यात आल्या.
यामध्ये श्री तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती, आई भवानींची तेजस्वी दिव्य प्रतिमा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य आकृती पाहून भाविक भारावून गेले.
विशेषतः आकाशात उजळून निघालेल्या आई भवानींच्या तेजस्वी रूपाने उपस्थितांमध्ये भक्तिरस संचारला. प्रकाशयोजना आणि संगीतमय पार्श्वसंगीतामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.

▪️जय भवानी,जय शिवाजी’चा जयघोष

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती आकाशात साकारताच संपूर्ण मैदानातून जय भवानी जय शिवाजी चा जयघोष घुमू लागला. या दृश्याने उपस्थित भाविकांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले.पावसामुळे स्थगित,शाकंभरीत अखेर साकार यापूर्वी २९ सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्रोत्सव २०२५ अंतर्गत हा ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता. मात्र, सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव तो स्थगित करावा लागला होता. अखेर शाकंभरी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत आज हा ऐतिहासिक ड्रोन शो यशस्वीपणे पार पडला.

▪️फटाक्यांच्या आतषबाजीत उत्सवाला कळस

ड्रोन शोच्या समारोपानंतर तेरखेडा फटाका असोसिएशनच्या वतीने नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रंगीबेरंगी रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला आणि शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या उत्सवात अधिकच रंगत आली.
भाविकांनी मोबाईलमध्ये कैद केला क्षण धाराशिव जिल्ह्यात प्रथमच झालेल्या या भव्य ड्रोन शोबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.

▪️अनेक भाविकांनी हा ऐतिहासिक क्षण मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत आठवणी जपल्या.

एकूणच, श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित हा ड्रोन शो भक्ती, परंपरा व आधुनिकतेचा अद्भुत संगम ठरला असून, भाविकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणारा सोहळा म्हणून ओळखला जाणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे