Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

आरक्षित जागेच्या ‘फेरफारा’वर कारवाई करा; शिवाजी चौकात अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारा!

शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांचे प्रशासनाला निवेदन; बेकायदेशीर नोंद रद्द करून चौकशीची मागणी

0 8 5 6 2 6

आरक्षित जागेच्या ‘फेरफारा’वर कारवाई करा; शिवाजी चौकात अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारा!

शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांचे प्रशासनाला निवेदन; बेकायदेशीर नोंद रद्द करून चौकशीची मागणी

तुळजापूर, दि. २८ : प्रतिनिधी

तुळजापूर नगर परिषद क्षेत्रातील आरक्षित खुल्या जागेच्या कथित बेकायदेशीर हस्तांतरणप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, तसेच शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारावा, अशा दुहेरी मागण्या शिवसेना धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम (परमेश्वर) यांनी प्रशासनाकडे केल्या आहेत.

याबाबत त्यांनी तहसीलदार, तुळजापूर यांच्यामार्फत विभागीय आयुक्तांकडे निवेदन पाठविले असून, दुसरे निवेदन नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे.

आरक्षित खुल्या जागेच्या फेरफारावर आक्षेप

निवेदनात अमरराजे कदम यांनी म्हटले आहे की, सन २०२३ मध्ये नगर परिषदेत लोकप्रतिनिधींचे मंडळ अस्तित्वात नसताना प्रशासकाच्या कालावधीत तुळजापूर कार्यक्षेत्रातील गट क्र. २२२/२ मधील ० हेक्टर ८४.५० आर क्षेत्राची नगर परिषदेची आरक्षित खुली जागा हस्तांतरित करण्यात आली.

दि. १ सप्टेंबर २०२३ रोजीच्या आदेशानुसार ही जागा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास तीन वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यानंतर गाव नमुना ६ मधील फेरफार नोंद क्र. १५८१३, दि. ४ सप्टेंबर २०२३ अन्वये सात-बारा उताऱ्यावर इतर हक्कात नोंद घेण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

कायद्याने आरक्षित असलेल्या खुल्या जागेचा अन्य कारणासाठी वापर करता येत नसल्याचा दावा करत, फेरफार नोंद क्र. १५८१३ रद्द करून सात-बारा उताऱ्यावरील नोंद पूर्ववत करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा

या प्रकरणाची सखोल चौकशी करून तत्कालीन मुख्याधिकारी, प्रशासक आणि संबंधित महसूल अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी. दोष आढळल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

नगर परिषदेची खुली जागा तिच्या मूळ आरक्षित कारणासाठीच सुरक्षित ठेवावी, अशीही आग्रही भूमिका मांडण्यात आली आहे.

शिवाजी चौकात अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी

दरम्यान, तुळजापूर शहराच्या मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सन्मानपूर्वक भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणीही अमरराजे कदम यांनी नगर परिषदेकडे केली आहे.

या स्मारकासाठी नगर परिषदेचे जुने व बाधित व्यापारी गाळे हटवून राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रस्तावित पुतळ्यालगतच्या जागेचा योग्य वापर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

पुतळा परिसराचे सुशोभीकरण, आकर्षक रोषणाई आणि नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करावी. बाधित गाळे हटविण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करून पुतळा उभारणीच्या आराखड्यास लवकर मंजुरी द्यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

आरक्षित जागेच्या फेरफारप्रकरणी चौकशी आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या मागणीवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता तुळजापूरकरांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे