ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
जुनी कन्या शाळा परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी
मंकावती गल्लीतील दुचाकी पार्किंगबाबतही निवेदन

0
7
6
4
9
7
जुनी कन्या शाळा परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी;मंकावती गल्लीतील दुचाकी पार्किंगबाबतही निवेदन
तुळजापूर | प्रतिनिधी
तुळजापूर शहरातील साळुंके गल्ली येथील जुनी कन्या शाळा इमारतीची पडझड झाल्यानंतर परिसरात मोठी मोकळी जागा निर्माण झाली आहे. मात्र या जागेचा गैरवापर सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मद्यपी समाजकंटकांकडून येथे खुलेआम दारू पिणे, बाटल्या फोडणे व भांडणाचे प्रकार वारंवार घडत असल्याने परिसरातील महिला, विद्यार्थीनी तसेच ज्येष्ठ नागरिक भयग्रस्त झाले आहेत.
या गंभीर बाबीची दखल घेत तुळजापूर नगरपालिकेचे नूतन नगरसेवक सुनील रोचकरी यांनी दि. २६ डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले. निवेदनात असे नमूद केले आहे की,जुनी कन्या शाळा परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात महिला, विद्यार्थीनी, लहान मुले व वृद्धांची वर्दळ असते. मात्र मद्यपींच्या गोंधळामुळे परिसर असुरक्षित बनला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे नमूद करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरात दररोज किमान दोन वेळा पोलीस गस्त वाढवून समाजविघातकांवर कठोर कारवाई करण्याची ठोस मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात येणारे अनेक भाविक आपली दुचाकी वाहने मंकावती गल्ली व लगतच्या अरुंद बोळात पार्क करीत असल्याने तेथे कायमची वाहतूक व पार्किंग समस्या निर्माण झाली आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी दुचाकी पार्किंगवर निर्बंध घालून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, सदर जुनी कन्या शाळा पार्किंगमुळे पुजारी, स्थानिक रहिवासी व भाविकांची काही प्रमाणात सोय होत असली तरी येथे बसणाऱ्या तळीरामांमुळे भाविक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.निवेदन देताना नगरसेवक सुनील रोचकरी यांच्यासह विनीत रोचकरी, गणेश शेळके, राहुल भालेकर आदी उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी,अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
0
7
6
4
9
7




