ब्रेकिंगमहाराष्ट्र
स्पा सेंटर सुरू ठेवण्यासाठी ‘हप्ता’ मागितल्याचा आरोप; कळंबमधील दोन पोलीस अंमलदारांवर एसीबीचा सापळा
३६ हजारांची लाच स्वीकारताना एक पोलिस अंमलदार रंगेहाथ ताब्यात; दुसऱ्याचा शोध सुरू

0
7
6
4
9
9
स्पा सेंटर सुरू ठेवण्यासाठी ‘हप्ता’ मागितल्याचा आरोप; कळंबमधील दोन पोलीस अंमलदारांवर एसीबीचा सापळा
३६ हजारांची लाच स्वीकारताना एक पोलिस अंमलदार रंगेहाथ ताब्यात; दुसऱ्याचा शोध सुरू
कळंब : धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे स्पा सेंटर व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी मासिक हप्त्याच्या स्वरूपात लाचेची मागणी करणाऱ्या दोन पोलीस अंमलदारांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई केली. ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलिस अंमलदाराला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून, दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दि. १० मे २०२६ रोजी ३३ वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली होती. तक्रारदार यांचा कळंब येथे ‘रिलॅक्स स्पा सेंटर’ व्यवसाय असून तो सुरळीत चालू ठेवण्यासाठी पोलीस अंमलदार सिद्धेश्वर प्रकाश शिंदे यांनी पोलीस निरीक्षकांसाठी २० हजार रुपये, तर पोलीस अंमलदार अशोक दादाराव करवर यांनी दुय्यम अधिकाऱ्यांसाठी २० हजार रुपये, असे एकूण ४० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
तक्रारदाराने अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली असता, “अधिकाऱ्यांना भेटलास तर तुझा स्पा व्यवसाय बंद करून कारवाई करतील. व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर आम्हालाच हप्ता द्यावा लागेल,”असे दोन्ही आरोपींनी सांगितल्याचा आरोप आहे.
एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, दि. १० मे रोजी बागवान चौक, कळंब येथे पंचासमक्ष आरोपींनी ३६ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्यास कबुली दिल्याचे निष्पन्न झाले.यानंतर दि. ११ मे २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. कळंब शहरातील होळकर चौकातून तांदळवाडी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या ‘हॉटेल गुलमोहर बिर्याणी हाऊस’ समोर तक्रारदाराच्या स्विफ्ट कारमध्ये पोलीस अंमलदार अशोक दादाराव करवर (वय ३४, बक्कल नं. ४१७, पोलीस स्टेशन कळंब) यांना ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
आरोपीच्या अंगझडतीत ३६ हजार रुपयांची लाच रक्कम, ३५० रुपये रोख, मोबाईल, कार व मोटारसायकलच्या चाव्या जप्त करण्यात आल्या. मोबाईल हस्तगत करून तपासणीची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने सांगितले.दुसरे आरोपी सिद्धेश्वर प्रकाश शिंदे (वय ३७, बक्कल नं. १३८९) यांचा शोध सुरू असून, दोन्ही आरोपींच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे. कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.ही कारवाई बाळू संपती जाधवर, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विजय वगरे हे काम पाहत आहेत.या कारवाईसाठी पोहेकॉ गजानन घायवट, पोलीस अंमलदार मनोहर भुतेकर, गणेश चेके, संदीपान लहाने, गजानन कांबळे तसेच चालक भालचंद्र बिनोरकर यांनी सहभाग घेतला.दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी झाल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0
7
6
4
9
9



