खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा !
खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा !
खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा !
भुम, दि.१३; प्रतिनिधी
भुम येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. बी. जी. धर्माधिकारी यांनी सोमवारी दिलेल्या निकालात खुनाच्या गुन्ह्यात आरोपीस जन्मठेपेची सश्रम कारावास व पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हनुमंत दिगंबर देशमुख (रा. मांडवा, ता. वाशी) याने वैयक्तिक रागातून त्याच गावातील बबन देशमुख यांच्यावर १४ मे २०२३ रोजी त्यांच्या शेतात चाकूने भोसकून गंभीर जखमी केले होते. जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना बबन देशमुख यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४६/२०२३ अंतर्गत भा.दं.वि. कलम ३०२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचा तपास स.पो.नि. आर. एन. ससाणे यांनी पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर खटला (के.३३/२०२३) मध्ये सरकार पक्षाने एकूण १४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले.
न्यायालयाने साक्षीदारांचे निवेदन व परिस्थितीजन्य पुरावे विचारात घेऊन आरोपीस दोषी ठरवले. त्यानुसार, आरोपीस कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेचा सश्रम कारावास व ५,००० रुपये दंडाची, तसेच कलम ५०६ अंतर्गत दोन वर्षांचा सश्रम कारावास व १,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू ॲड.जयंत देशमुख व ॲड. किरण डी. कोळपे (अति. सरकारी अभियोक्ता,भुम) यांनी प्रभावीपणे मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून स.पो.फौ. बाजीराव बळे यांनी काम पाहिले.



