ब्रेकिंगमहाराष्ट्र
बसवंतवाडीत पालक सचिव डॉ. राजेश देशमुख यांनी बांधावर जाऊन जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा; चाऱ्याची टंचाई दूर करण्यासाठी १,५०० एकरांवर चारा लागवडीचे नियोजन
दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त; सोयाबीन उभे, पण शेंगांत दाणेच नाहीत!

0
8
5
6
2
6
दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त; सोयाबीन उभे, पण शेंगांत दाणेच नाहीत!
बसवंतवाडीत पालक सचिव डॉ. राजेश देशमुख यांनी बांधावर जाऊन जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा; चाऱ्याची टंचाई दूर करण्यासाठी १,५०० एकरांवर चारा लागवडीचे नियोजन
तुळजापूर | तुळजापूरनामा
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीनच्या शेंगांत दाणे भरले नाहीत, उत्पादनाचा खर्च निघण्याचीही शाश्वती नाही आणि दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. शेती उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर असताना पशुधन जगवायचे कसे, असा दुहेरी पेच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. या भीषण दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. राजेश देशमुख यांनी १८ ऑक्टोबर रोजी तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

सोयाबीनची झाडे उभी; उत्पन्नाची मात्र चिंता!
बसवंतवाडी येथील शेतकरी देवानंद शिंदे यांच्या शेतात जाऊन डॉ. देशमुख यांनी सोयाबीन पिकाची पाहणी केली. यंदा पाऊस उशिरा आल्याने ८ जुलै रोजी पेरणी केली. सुरुवातीला पीक चांगले उगवले; मात्र शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने दडी मारल्याने झाडांची वाढ खुंटली. शेंगांची संख्या कमी झाली आणि त्यातील दाणेही बारीक राहिले. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

पीक हातचे जात असताना कापणीचा खर्च मात्र शेतकऱ्यांच्या माथी कायम आहे. सोयाबीनच्या झाडांची उंची कमी असल्याने यंत्राद्वारे कापणी करणे शक्य नसून मजुरांच्या हाताने कापणी करावी लागणार आहे. त्यासाठी प्रतिहेक्टरी सुमारे पाच हजार रुपये खर्च येणार असल्याची व्यथा शिंदे यांनी मांडली. उत्पन्नाची हमी नाही, पण खर्चाचा बोजा मात्र निश्चित, अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे.

विहिरीत पाणी नाही; रब्बीचे नियोजनही पावसावर!
रब्बी हंगामाबाबत विचारणा करताना डॉ. देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या पुढील नियोजनाची माहिती घेतली. शेतात विहीर असली तरी सध्या पाणी नसल्याने रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक पावसावर अवलंबून असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यंदा शासकीय योजनेतून शेततळे बांधल्याची तसेच महाडीबीटी प्रणालीतून सोयाबीनचे बियाणे घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

सहा म्हशींचे पालन; चारा संपल्याने दुग्धव्यवसाय संकटात!
दुष्काळाचा फटका केवळ पिकांनाच बसलेला नाही, तर शेतीला आधार देणाऱ्या दुग्धव्यवसायालाही त्याची झळ बसत आहे. देवसिंग (तुळ) येथील दूध उत्पादक शेतकरी नेताजी जाधव यांनी सहा म्हशींच्या चाऱ्याचा प्रश्न पालक सचिवांसमोर मांडला.
शेतीत मका आणि ज्वारीची लागवड करून त्यातून जनावरांसाठी चारा उपलब्ध केला जातो. मात्र, यंदा पावसाअभावी या पिकांचे उत्पादन घटले आहे. तुरीचे पीकही वाळून गेल्याने जनावरांसाठी कुटार मिळण्याची आशा मावळली आहे. सध्या अत्यल्प चारा शिल्लक असून आगामी काळात पशुधन जगवायचे कसे, हा गंभीर प्रश्न असल्याचे जाधव यांनी सांगितले.
शेतात पीक नाही, चाऱ्याची उपलब्धता नाही आणि जनावरांच्या संगोपनाचा खर्च सुरूच आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा पूरक आधार असलेला दुग्धव्यवसायही संकटात सापडल्याचे या संवादातून स्पष्ट झाले.
मदतीसाठी याद्या तयार ठेवा; चाऱ्यालाही हमीभाव!
शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर डॉ. राजेश देशमुख यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत करण्याच्या दृष्टीने संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी अद्ययावत याद्या व आवश्यक माहिती तयार ठेवावी, अशा सूचना दिल्या. जिल्ह्यातील संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी नियोजन केले असल्याचेही त्यांनी सांगितले. चाऱ्यालाही हमीभाव देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्ह्यात आगामी काळात पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी १ हजार ५०० एकर क्षेत्रावर चारा लागवडीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.
अधिकाऱ्यांचा ताफा शेताच्या बांधावर
या पाहणीवेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सागर खटकाळे, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, ग्रामसेवक खोपडे आणि कृषी सहाय्यक होळकर उपस्थित होते.
दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसान, पाण्याची उपलब्धता, रब्बी हंगामाचे नियोजन आणि पशुधनाच्या चाऱ्याची समस्या जाणून घेण्यात आली. आता या पाहणीनंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत किती आणि किती लवकर मिळते, याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.
0
8
5
6
2
6



