Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पंचायत समितीतील तोडफोडप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना शाखा धाराशिवची मागणी; अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील कथित खोट्या तक्रारींची सखोल चौकशी करा

0 8 5 6 3 1

पंचायत समितीतील तोडफोडप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना शाखा धाराशिवची मागणी; अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील कथित खोट्या तक्रारींची सखोल चौकशी करा

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर पंचायत समिती, तुळजापूर येथील कार्यालयातील कथित तोडफोड, शासकीय कागदपत्रांचे नुकसान आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या कथित धमकीप्रकरणी संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना, शाखा धाराशिव यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेने तुळजापूर विभागाच्या पोलीस उपअधीक्षकांना निवेदन देऊन संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

संघटनेच्या निवेदनानुसार, एका प्रशासकीय चौकशीच्या विषयावरून काही व्यक्तींनी पंचायत समिती कार्यालयात प्रवेश करून गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ घालत तोडफोड केली तसेच शासकीय कागदपत्रांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

◾‘खोट्या तक्रारींद्वारे प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न’

तोडफोडीप्रकरणी झालेल्या कायदेशीर कारवाईचा आकस धरून पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात ॲट्रॉसिटी व विनयभंगासंदर्भात कथित खोटे अर्ज देऊन दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना शाखा धाराशिवने केला आहे. तसेच एका चित्रफितीद्वारे गटविकास अधिकाऱ्यांना जाहीर धमकी देण्यात आल्याचाही दावा संघटनेने केला आहे.

शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आणि शासकीय लोकसेवकांना धमकी देणाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. त्याचबरोबर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या तक्रारींचीही निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

◾काळ्या फिती लावून निषेध; कारवाई न झाल्यास कामबंदचा इशारा

या प्रकाराच्या निषेधार्थ दि. २० जुलै रोजी धाराशिव जिल्ह्यातील लेखा कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदवणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्भयपणे कर्तव्य बजावता यावे यासाठी सुरक्षित वातावरण आणि आवश्यक पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. मागण्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना शाखा धाराशिवच्या वतीने संपूर्ण कामकाज बंद करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणत दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे