Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजाभवानी मंदिरात विकासकामांमुळे दर्शनासाठी लागू शकतो अधिक वेळ; भाविकांना सहकार्याचे आवाहन

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढण्याची शक्यता; आवश्यकतेनुसार दर्शन रांगा काही काळ तात्पुरत्या थांबविणार

0 8 5 6 3 1

तुळजाभवानी मंदिरात विकासकामांमुळे दर्शनासाठी लागू शकतो अधिक वेळ; भाविकांना सहकार्याचे आवाहन

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढण्याची शक्यता; आवश्यकतेनुसार दर्शन रांगा काही काळ तात्पुरत्या थांबविणार

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर परिसरात सध्या जीर्णोद्धार व विविध विकासकामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. त्यातच आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकरी तसेच देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने मंदिर संस्थानाने भाविकांना संयम राखून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानामार्फत भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत दर्शन मिळावे यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. मात्र, मंदिर परिसरात सुरू असलेली विकासकामे आणि वाढती गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने दर्शन व्यवस्थेत वेळोवेळी आवश्यक बदल केले जाऊ शकतात.

◾गर्दी वाढल्यास दर्शन रांगा तात्पुरत्या थांबणार

मंदिर परिसरात भाविकांची गर्दी अत्यधिक वाढल्यास सुरक्षेच्या कारणास्तव आणि दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी धर्मदर्शन रांग, मुखदर्शन रांग तसेच ३०० रुपये देणगी दर्शन रांग काही कालावधीसाठी तात्पुरती थांबविण्यात येऊ शकते. गर्दी कमी झाल्यानंतर संबंधित दर्शन व्यवस्था तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे मंदिर संस्थानाने स्पष्ट केले आहे.

◾भाविकांच्या मदतीसाठी विशेष सहाय्यता पथक

भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात विशेष सहाय्यता पथक कार्यरत आहे. या पथकामार्फत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच हरवलेल्या भाविकांना आवश्यक मदत, दर्शनासाठी मार्गदर्शन, विविध सुविधांची माहिती आणि इतर आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे.

दर्शन मंडपातील प्रत्येक मजल्यावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी भाविकांसह श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील गर्दीचे नियोजन आणि भाविकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे.

मंदिर परिसरातील विकासकामे आणि वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी मंदिर प्रशासनास सहकार्य करावे तसेच वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे