ब्रेकिंगमहाराष्ट्र
‘देशसेवा करणाऱ्यांना देशद्रोही म्हटल्याचा पुरावा द्या, अन्यथा माफी मागा’
प्रशासनाच्या भूमिकेविरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आक्रमक; काटीतील अतिक्रमणाचा मूळ प्रश्न सहा महिन्यांपासून प्रलंबित असल्याचा आरोप
0
8
5
6
3
1
‘देशसेवा करणाऱ्यांना देशद्रोही म्हटल्याचा पुरावा द्या, अन्यथा माफी मागा’
प्रशासनाच्या भूमिकेविरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आक्रमक; काटीतील अतिक्रमणाचा मूळ प्रश्न सहा महिन्यांपासून प्रलंबित असल्याचा आरोप
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शासकीय जागेवरील रस्त्याच्या कथित अतिक्रमणाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला आता वेगळे वळण मिळाले आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने दि.२३ जूर्ले रोजी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर आरोप करत, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचा आवाज कथित खोट्या गुन्ह्यांच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी समितीने केली आहे.
◾‘२४ वर्षे देशसेवा केली, तरी देशद्रोही कसे?’
संघटनेच्या एका पदाधिकारी तथा माजी सैनिकांनी तब्बल २४ वर्षे भारतीय सैन्यांत सेवा बजावली असून देशसेवेदरम्यान गोळ्याही झेलल्या आहेत. असे असतानाही उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालया समोर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून प्रतिक्रिया देताना कथितरीत्या ‘देशद्रोही’ असा उल्लेख करण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.
“ दोन माजी सैनिकाला देशद्रोही म्हटले असेल तर त्याचा पुरावा संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावा; अन्यथा जाहीर माफी मागावी. देशासाठी आयुष्याची २४ वर्षे देणाऱ्या सैनिकाचा अपमान सहन केला जाणार नाही,” अशी आक्रमक भूमिका संघटनेने मांडली आहे.
◾काटीतील अतिक्रमणाचा प्रश्न सहा महिन्यांपासून प्रलंबित?
काटी येथील शासकीय रस्त्यावरील कथित अतिक्रमणाबाबत सहा महिन्यांपूर्वी प्रशासनाकडे लेखी अर्ज देण्यात आला होता. मात्र अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा समितीने केला. शासकीय जागेचे संरक्षण आणि अतिक्रमणाबाबत नियमानुसार कारवाई करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना एवढा विलंब का झाला, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
“हा सामाजिक आणि सार्वजनिक रस्त्याशी संबंधित प्रश्न आहे. त्याला भाऊबंदकीचे स्वरूप देऊ नये. सहा महिन्यांपासून कारवाई का झाली नाही आणि संबंधित अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत का, याचीही चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी समितीने केली.
◾पंचायत समितीतील आरोपांचे खंडन
दि. १५ जुलै रोजी पंचायत समिती कार्यालयात घडलेल्या घटनेबाबत प्रशासनाकडून करण्यात आलेले संगणकाची तोडफोड, फायलींची नासधूस आणि पेट्रोलच्या बाटल्यांशी संबंधित आरोप समितीने फेटाळून लावले आहेत. त्या दिवशी अनेक पत्रकार उपस्थित असल्याने प्रत्यक्षात काय घडले याची निष्पक्ष चौकशी करावी, अशी भूमिका समितीने घेतली.
अतिक्रमणाच्या मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी प्रकरणाला वेगळे वळण दिले जात असल्याचा आरोपही समितीने केला. आपल्यावरील आरोप आणि दाखल गुन्ह्यांविरोधात न्यायालयात दाद मागून सत्य समोर आणणार, असे समितीने स्पष्ट केले.
◾‘लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सहन करणार नाही’
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आणि माहितीचा अधिकार अधिनियमाचा उल्लेख करत समितीने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. नागरिकांनी वारंवार अर्ज व निवेदने देऊनही प्रश्न सुटत नसतील तर त्यांना न्याय मिळविण्यासाठी कोणता मार्ग उरतो, असा सवाल पत्रकार परिषदेत करण्यात आला.
गटविकास अधिकारी, संबंधित अधिकारी-कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनाच्या भूमिकेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी, आंदोलनकर्त्यांवर कथित खोटे गुन्हे दाखल झाले असतील तर त्याबाबत कायदेशीर तपास करून योग्य निर्णय घ्यावा आणि काटी येथील शासकीय जागेवरील कथित अतिक्रमणाबाबत तातडीने नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली.
मागण्यांची दखल न घेतल्यास न्यायालयीन लढाईबरोबरच राज्यव्यापी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने दिला आहे.या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष गणेश पाटील,बालाजी जाधव,माजी सैनिक श्रीकांत घाटे, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी दत्तात्रय सोनवणे, महिला पदाधिकारी आदि उपस्थित होत्या.
चौकट …..
‘देशद्रोही’ संबोधल्याचा दावा, खोटे गुन्हे, अतिक्रमण, अधिकाऱ्यांवरील दबाव तसेच तोडफोडीसंदर्भातील दावे-प्रतिदावे हे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत मांडलेल्या भूमिकेवर आधारित आहेत. संबंधित प्रशासन व अधिकाऱ्यांची बाजू आणि अधिकृत तपासातील निष्कर्षानंतर वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होईल.
0
8
5
6
3
1



