Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

नांदेड दुर्घटनेनंतर तुळजापूर खुर्दच्या उड्डाण पुलाची धावती पाहणी!

पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; तहसीलदारांचे महामार्ग विभागाला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

0 8 5 6 3 1

नांदेड दुर्घटनेनंतर तुळजापूर खुर्दच्या उड्डाण पुलाची धावती पाहणी!

पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; तहसीलदारांचे महामार्ग विभागाला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी

नांदेड येथील उड्डाण पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर खुर्द येथील उड्डाण पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तत्काळ दखल घेत पाहणी केली आहे. तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी बुधवारी (दि. ५) सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पुलाची तसेच परिसरातील परिस्थितीची पाहणी करत संबंधित यंत्रणांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

तुळजापूर खुर्दजवळील बाह्यवळण रस्त्यावरील उड्डाण पुलालगतच्या सर्व्हिस रोडवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पुलाच्या बांधकामातून पाणी झिरपत असल्याने पुलाच्या सुरक्षिततेबाबतही स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

नांदेडमधील उड्डाण पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत महामार्ग विभागाला पुलाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यावेळी ग्राम महसूल अधिकारी शरद दूधभाते, मंडळ अधिकारी अमर गांधले, राजाभाऊ देशमाने, दुर्वास भोजणे, विष्णू गाठे, मोहन भोजणे, चंद्रकांत साबळे, उमेश गाठे, अरुण भोजणे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे शेतजमिनी पाण्याखाली जात असून मोठे नुकसान होत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी तहसीलदारांसमोर मांडली. अनेक वर्षांपासून निवेदने आणि तक्रारी करूनही प्रश्न प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी शेतकऱ्यांनी तातडीने पाईप टाकून पाण्याचा निचरा करावा, सर्व्हिस रोडवर मुरूम टाकून वाहतूक सुरळीत करावी आणि पुलाच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली.

“नांदेडसारखी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा, संभाव्य धोका टाळण्यासाठी आताच ठोस उपाययोजना करा,” अशी मागणी उपस्थित ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे